मुलांना त्यांचे शिक्षण मातृभाषेतूनच (किंवा परिसरात नेहमी कानावर पडणाऱ्या स्थानिक भाषेतून) दिल्या जावे। असे आमचे (म्हणजे माझे) मत आहे।
माझा पहिला सवाल म्हणजे जे विषय आपल्याया आपल्या बालपणात मराठीतून सुद्धा नीट समजले नाही, ते या इंग्रजी कॉन्व्हेंट वाल्यांना काय कळणार? जरा विचार करा मित्रांनो। हे इंग्रजी वाले फक्त मुलांकडून पढवून घेतात। (स्वानुभवावरून सांगतो)
आकलन शून्य। विचारशक्ती शून्य।
अशा दळभद्री शिक्षणात केवळ नौकऱ्यांसाठी कुशल (अगदी अव्वल दर्जाचे) कामगार तयार करण्याची क्षमता आहे। या कॉन्व्हेंट मधील मुले ही कमालीची आत्मकेन्द्री (बह्वंशी) निघतात। यांना शाळेबाहेर चे विश्व समजत (फारसे) नाही। याऊलट मराठी शाळेतील मुले बघा। म्हणजे फक्त नीट निरीक्षण (आपल्या मुलांचे पितृसुलभ कौतूक दूर) करून बघा। फरक साफ समजेल।
मी इथे आपल्यासमोर काही मुद्दे मांडणार आहे। आपण कृपया त्यांचा साधकबाधक युक्ती ने विचार करावा।
जुगाड – वरदान की शाप
जर विचार करा मित्रांनो शंभर कोटींच्या देशात संशोधक कमी आणि जुगाड करणारेच का सापडतात?
आपण भारतीयांना जुगाड तन्त्रज्ञानाचे फार कौतुक आहे हो। मुळात मला जेव्हा ही कोणीतरी केलेला जुगाड दिसतो, तेव्हा मला फार वाईट वाटते (कधी कधी अक्षरशः रडू सुद्धा कोसळते।)
कारण मला त्या जुगाड करणाऱ्या गरीब माणसात (इंग्रजीच्या हल्यात पराभूत झालेला) वैज्ञानिक दिसतो।
खरेच मित्रांनो यांच्या तारुण्यात विज्ञानाला इंग्रजीच्या जोखडातून (जापान वगैरे देशांसारखे) मुक्त केले असते, तर हीच जुगाडी मंडळी भारतात काय काय चमत्कार करू शकली असती।
माझा मुद्दा समजून घ्या, यां इंग्रजी शिक्षणातून आपल्या भारतात फक्त विदेशी कंपण्यांत काम करणारे गुलाम तयार होतील। यांच्यात मूलभूत संशोधन करणारे फार कमी निघतील।
मूलभूत संशोधन होणे गरजेचे आहे।
मूलभूत संशोधन होण्यासाठी गहन विचारशक्ती व संबंधित विषयातील विद्वत्ता अपेक्षित असते।
आणि यात जेव्हा इंग्रजीची, पालकांच्या अपेक्षांची, इंग्रजी माध्यमातील महागड्या शिक्षणाची, महाविद्यालयातील छळाची आणि पुढे संसाराची भर पडते तेव्हा मूलभूत संशोधनाची आशा कोणाकडून करायची।
उगाच इंग्रजीचा बागुलबुआ नको।
मित्रांनो, खरेच एखादी भाषा एवढी कठिण असू शकते का?
नाही। तुम्ही एक प्रयोग करा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात दोनच वर्षे भिकारी म्हणून जगा। तुम्हाला त्या प्रदेशाची भाषा (कितीही कठिण असली तरीही – अगदी चीनी सुद्धा) अस्खलित पणे बोलता येईल।
मग ही बटकीची इंग्रजीच फक्त इयत्ता पहली ते बारावी असे तप करून सुद्धा का येत नाहीं?
कारण – आंधळेपणा।
विचार करा – आपल्या जि॰प॰ शाळेतील इंग्रजी शिक्षक जर वर्षभर मुलांशी (समजो अगर न समजो) इंग्रजी बोलला (म्हणजे इंग्रजी शिक्षकाला स्वतःला बोलता येत असेल), तर मुलांना इंग्रजी शिकायला किती दिवस लागतील?
पण शिक्षक मुलांशी इंग्रजी बोलला तर मुलांना समजत नाही म्हणे। मग मुले परीक्षेत पास कशी होतील? इथे ज्ञान महत्त्वाचे नाही। मुले फटाफट पास कशी होतील तेवढे पहायचे।
इंग्रजी साठी इतर विषयांचा बळी का द्यावा?
तर मग मुलांना फक्त इंग्रजी यावी म्हणून इंग्रजी माध्यातून इतिहास, गणित, विज्ञान इ॰ महत्त्वाच्या विषयांचा बळी द्यायचा?
आता तुम्ही म्हणाल की – मानलं। ठीक आहे। पण मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही। खाजगी इंग्रजी शाळांमध्ये चांगलं शिकवतात।
पण मित्रांनो विचार करा। चांगलं शिकवतात म्हणजे काय शिकवतात?
खाजगी इंग्रजी शाळांचे वास्तव
या खाजगी इंग्रजी शाळांमध्ये कसेतरी, काहीतरी शिकलेली मुले मुली शिक्षक म्हणून (कमी पगारात) उभे करतात। आणि त्यांच्या मागे हंटर घेऊन उभे राहतात। त्या शिक्षकाचा वेश चढवलेल्या कारकूना कडून मुलांचा गृहपाठ करून घेतात, मुलांकडून अभ्यास नावाचा रट्टा मारून घेतात। मुलांनी (न समजता) लिहिलेल्या वह्यांत लाल शाईत सह्या करवून घेतात।
आणि आपण पालक खूश असतो। वाह। शाळेतील शिक्षकांनी वह्या तपासलेल्या आहेत, आपल्या बाळाचा अभ्यास (वही) पूर्ण आहे। आणि महत्त्वाचे म्हणजे परीक्षेत गुण (फारच) चांगले आहेत।
वाः। छान शिक्षण आहे।
मित्रांनो याऊलट विचार करा। जि॰प॰ शाळांमध्ये खरोखर बुद्धिमान शिक्षक असतात। नीट वाचा – मी जि॰प॰ शाळा म्हणतोय खाजगी अनुदानित शाळा नाही। कारण तिथे शाळेच्या संचालक मंडळाला भरभक्कम लाच देऊन नालायक लोकांची शिक्षक म्हणून भरती केलेले बऱ्यापैकी अज्ञानी पोटभरू लोक सुद्धा असतात।
तर मी जि॰प॰ शाळांची बात करत होतो। खरोखर जि॰प॰ शाळांचे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन शिक्षक झालेले असतात। ते लाच देऊन शिक्षक झालेले नसतात।
फक्त तिथे मुलांकडून अभ्यस करवून घेतलाच पाहिजे असा (खाजगी इंग्रजी शाळांत असतो तसा) दंडक नसतो। आणि शासकीय कागदत्रांची साठमारी करण्यात बिचाऱ्या शिक्षकांची बुद्धिमत्ता खर्च होत असते। म्हणून तिथली परिस्थिती वाईट दिसते।
तर मग आता पालक म्हणून आम्ही काय करायचं?
मित्रांनो। मी सुद्धा एक शिक्षकच (अगदी विद्वान, प्रकांड पंडित वगरै नाही) आहे।
मी स्वतः खाजगी इंग्रजी शाळांमध्ये शिक्षक म्हणून काम केलेले आहे। या दळभद्री शाळांमध्ये शिक्षणाच्या नावाखाली (आर्थिक लूट तर चालतेच। पण आजचा विषय प्रत्यक्ष वर्गातील शिक्षण असा आहे) काय काय चालते, हे मी जवळून पाहिले आहे।
अर्थातच चांगली बुद्धिमान मुले आटापिटा करून इंग्रजी शाळेत घातली जातात। त्यामुळे त्या मुलांच्या पुण्याईने त्या शाळा चमकतात। आणि बिचाऱ्या
मराठी शाळा मात्र बुद्धिमान मुलांच्या ‘अभावाने’ आणि शासकीय मूर्खपणाच्या ‘प्रभावाने’ कुपोषित होतात।
यावर उपाय काय?
मित्रांनो उपाय आहे।
इंग्रजी शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा शिकवणी?
मला एका गोष्टीचा फार राग येतो। पालक हजारो रुपये मोजून इंग्रजी शालेत मुलांना घालतात। पण (तथाकथित दर्जेदार शिक्षण देणाऱ्या) इंग्रजी शाळेत टाकून सुद्धा खाजगी शिकवण्या (ट्यूशन) किती मुलांना लावावी लागते। म्हणजे इंग्रजी शाळेत जाऊन सुद्धा विषय समजून घेण्यासाठी पुन्हा संध्याकाळी अमुक सरांकडे सायकल पिटाळत जायचे। वाः! छान!
त्यापेक्षा मराठी माध्यमच बरे नाही का? मुलांना वर्गातच बऱ्यापैकी समजू शकते। आणि इंग्रजी शाळेत सुद्धा संध्याकाळी शिकवणी (पुन्हा सांगतो – ट्यूशन) साठी जावेच लागते, तर मराठी शाळेत (फुकट) प्रवेश घेऊन, जो पैसा इंग्रजी शाळांवर उधळला जातो, तोच पैसा (कदाचित त्याच शाळेतील) शिक्षकांना गुरुदक्षिणा देऊन शिकवण्या लावाव्या। आणि मुलांना दडपणातून मुक्त करावं।
शेवटी इंग्रजीचं काय?
तुम्ही फक्त पालक म्हणून एकच पथ्य पाळा। सगळे पालक एकीने शाळेत जा। आणि इंग्रजी शिक्षकाला म्हणा – इंग्रजीच्या तासात आमच्या मुलांना समजो अथवा न समजो, तुम्ही इंग्रजीतच बोलायचं, इंग्रजीतच शिकवायचं आणि इंग्रजीत रागवाचय। आम्हाला परीक्षेतील गुणांच काळजी (दहावी बोर्डाच्या परीक्षेपर्यन्त) नाही।
मित्रांनो मी प्रतिज्ञेवर सांगू शकतो की (बोले तो, दावे के साथ कह सकता हूँ कि) – दोन वर्षांत आपल्या मराठी मुलांनी इंग्रजी माध्यमातील मुलांच्या कानातील केस जाळलेच समजा।
मी एक भाषाशिक्षक आहे। मी संस्कृत विषय शिकवतो। पण माझ्या वर्गात मी मुलांशी संस्कृतातच (मुलांना समजो किंवा ना समजो) बोलतो। अगदी शिव्या सुद्धा संस्कृतातच। (हो, संस्कृतात सुद्धा शिव्या असू शकतात। अगदी हिन्दी मराठी च्या शिव्या जवळपास सुद्धा फिरकणार नाही इतक्या जहाल।)
मित्रांनो तुम्ही फक्त एकदाच संस्कृतभारती च्या दहा दिवसांच्या संस्कृत संभाषण शिबिरात जा। तुम्हाला दहा दिवसता संस्कृत भाषा बोलता येऊ लागेल। (मी स्वतः अनेकांना संस्कृत भाषा शिकवलेली आहे।)
खरंच्। दहा दिवसाच्या निवासी संस्कृत संभाषण वर्गात संस्कृत भाषा बोलणे शिकवले जाते। मग ही इंग्रजीच बारा बारा वर्षे तप (पहिली ते बारावी) करून सुद्धा का येत नाही? इंग्रजी काय आभाळातून पडलेली भाषा आहे काय?
कारण एकच। इंग्रजी शिक्षक इंग्रजी बोलत नाही। जर ते झालं। तर मराठी शाळांमध्ये इंग्रजीसह सर्व विषयांचा ज्ञानयज्ञ सुरू होऊ शकतो। मित्रांनो मला सांगा – आपल्याला हिंदी कोणी शिकवलं? कुणीही नाही (यात शाळा धरलेली नाही।) आपण बाजारात, सिनेमात ऐकून ऐकून हिन्दी शिकलो। बस तसेच आपण इंग्रजी शिकू शकतो।
इंग्रजी ही भुंकणारी कुत्री
इंग्रजी ही भुंकणाऱ्या (आणि न पिसाळलेल्या) कुत्र्यासारखी आहे। तिला भिलात तर जास्त भुंकेल। पण ठाम पाय रोऊन उभे राहिलात मात्र तुमची ईमानदार सुद्धा होईल।
मित्रांनो। त्यामुळे (इंग्रजी शाळांच्या) दिसण्यावर जाऊ नका। आपल्या घरची प्रेमाने बनवलेली भाकर पौष्टिक असते। त्या भाकरीने भूक नष्ट होऊन शरीराचे पोषण होते। बाहेर बनलेल्या कचोरी, वडापाव ने भूक भागत नाहीं, तो पौष्टिक सुद्धा नसतो। फक्त जिभेला चांगला लागतो म्हणून त्याकडे जाऊ नका।
अर्थात मी भालचन्द्र नेमाडें प्रमाणे –
या इंग्रजी शाळांवर अफूच्या गोळ्यांसारखी बंदी आणली पाहिजे।
असे म्हणनार नहीं। परन्तु व्यावसायिक पातळीवर मराठी शाळांनी इंग्रजी शाळांनी टक्कर दिली पाहिजे। खाजगी इंग्रजी शाळा चालतात, तशा व्यावसायिक (प्रोफेशनल) पद्धतीने मराठी शाळा सुद्धा चालू शकतात।
भाषा महान केव्हा बनते?
मित्रांनो, कोणतीही भाषा ही कधिच महान नसते। त्या भाषेचे पुत्र त्या भाषेला महान बनवतात।
इंग्रजांनी पराक्रम केला। सम्पूर्ण जगावर राज्य केलं म्हणून आज इंग्रजीचा बोलबाला आहे। म्हणून इंग्रजीच्या मागे धावत सुटू नका।
ताजं उदाहरण बघा। अमेरिका बलवान झाली तर ब्रिटीश इंग्रजी (UK English) मागे पडून अमेरिकन इंग्रजी (US English) पुढे आली। उद्या चीन बलवान झाला तर आपल्याला चीनी भाषा शिकावी लागेल। रशिया बलवान झाला तर रशियन भाषा शिकावी लागेल। आफ्रिकेत जर खोरखरचा वकांडा देश अस्तिवात असला तर त्यांची (झूलू?) भाषा शिकावी लागेल। शेवटी बदल हा निसर्गाचा नियम आहे।
किती किती भाषा शिकणार? मध्यंतरी विज्ञानाची भाषा जर्मन झाली होती। म्हणून अनेक वैज्ञानिक जर्मन भाषा शिकू लागले होते। त्यापेक्षा आपल्याच भाषेच्या सहाय्याने भौतिक प्रगती करा आणि इंग्रजांना आपल्या देशात नौकरी साठी ठेवा। त्यांनी आपल्याला (निरुपयोगी अशा) टाय (मराठीत – कंठलंगोट) ची सक्ती केली। आपण त्यांना खांद्यावर लांब-रूंद शेल्याची (खरेतर शेला हे एक बहूपयोगी वस्त्र आहे) सक्ती करू शकतो।
हे शक्य आहे मित्रांनो। गरज आहे स्वाभिमानाची, उद्यमी वृत्ती ची आणि –
पराक्रमाची।
पुनश्च – कदाचित माझा हा लेख आपल्याला अतिशयोक्तिपूर्ण वाटेल। अर्थात मराठी व्याकरणात अतिशयोक्ती नावाचा अलंकार आहे। जरी अतिशयोक्ती असेल तरी अतिशयोक्ती सुद्धा काही ना काही सत्याचा अंश असल्याशिवाय अस्तित्वात येऊ शकत नाही।